इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नीट व नेट परीक्षेतील गैरप्रकार समोर आल्यानंतर देशभर त्याविरोधात आंदोलन सुरु आहे. या परीक्षा पध्दतीवरही संताप व्यक्त केला जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधानावर चिमटा काढला आहे.
नरेंद्र मोदीजी यांनी सत्तेत आल्यावर पहिल्या शंभर दिवसांत अनेक क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते, त्याप्रमाणेच अनेक क्रांतीकारी गोष्टी घडल्याही आहेत. पहिल्या दहा दिवसांतच यूजीसी नेट परीक्षा रद्द झाली, नीट परीक्षा पेपर फुटल्याने रद्द झाली आणि आता नीटची पदव्युत्तर परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली. ‘देशाचे भविष्य हे देशाच्या वर्गखोल्यांमध्ये आकार घेत आहे’ असे कायम बोलले जाते, मात्र याच देशाच्या भविष्यासोबत केंद्र सरकार अक्षरशः खेळत आहे असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
अवघ्या १२ तास आधी परीक्षा रद्द करणे नक्की कशाचे द्योतक आहे ? मुळात अशा प्रवेश परीक्षा राज्य पातळीवर घेण्यात येऊन राज्यांना याबाबतीत अधिक स्वायत्तता दिली जावी, मात्र केंद्र शासनाला सर्व काही स्वतःच्या हातात ठेवायचे असल्याने या अडचणी उद्भवत आहेत.
या अनागोंदीमुळे उद्विग्न उद्या काही तरुण तरुणींनी टोकाचे निर्णय घेतले तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारची असेल.