नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लातूरपर्यंत ‘नीट यूजी’ परीक्षेच्या पेपरफुटीचे कनेक्शन आले असून दोन शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. नांदेडच्या ‘एटीएस’ पथकाने लातूरमध्ये दोन ठिकाणी छापे टाकले. दोन प्राथमिक शिक्षकांना अटक केली आहे. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण अशी त्यांची नावे आहेत. पेपरफुटी प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचा ‘एटीएस’ला संशय आहे.
लातूरमध्ये ‘नीट’ व ‘जेईई’च्या तयारीसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे परीक्षा गैरव्यवहारात या शहराचे काही धागेदोरे आहेत का या दृष्टीने तपास सुरू असताना शनिवारी रात्री नांदेड ‘एटीएस’च्या हाती हे दोन शिक्षक लागले. जाधव व पठाण हे दोघेही पीएच. डी. धारक असून ते लातूरमध्ये खासगी क्लासही घेतात. ‘नीट’चा पेपर फोडून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या रॅकेटमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे युनिटने (ईओयू) आपला तपास अहवाल शिक्षण मंत्रालयाला सादर केला आहे. या अहवालात म्हटले आहे, की नीट यूजी सुरू होण्यापूर्वीच हजारीबागच्या ओॲसिस स्कूलमधून पेपर फुटला होता. पाटण्यातील माफियांच्या व्हॉट्सॲपवर ज्या बुकलेट नंबर (६१३६४८८) चा पेपर आला होता, तो या शाळेला मिळाला होता. गोदामातून बँकेत किंवा बँकेतून परीक्षा केंद्रात येताना प्रश्नपत्रिका चोरीला गेली होती का, याचा तपास आता यंत्रणा करीत आहे.