इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – कुठल्याही जोडप्यासाठी किंवा विशेषतः महिलेसाठी मुल न होणे ही अत्यंत दुःखदायी बाब असते. त्यामुळे येणारे नैराश्य, सततच्या औषधांमुळे प्रकृतीवर होणारे परिणाम आदी गोष्टींचा सामना भविष्यात महिलांना करावा लागतो. यातून ग्रामीण भागात कौटुंबिक वादालाही तोंड फुटल्याचे बघितले जाते. मात्र वंध्यत्व येण्यामागची कारणे लक्षात घेतली तर त्यावर मात करणे शक्य आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
वंध्यत्वाचा सामना करणाऱ्या जोडप्यांनी या समस्येवर मात करण्यासाठी समुपदेशनाला प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे मनोविकार तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यात तथ्य आहे. कारण जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात सहा पैकी एका जोडप्याला वंध्यत्वाचा सामना करावा लागतो. हार्मोनल असंतुलन, प्रजननांचा विकार, प्रदूषण, अनुवांशिक आजार, धुम्रपान व मद्यपानासारख्या वाईट सवयी आणि मादक पदार्थांचा वापर यासारख्या कारणांमुळे पुरुष आणि स्त्रिया दोघांवरही त्याचा परिणाम होतो. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत पुरुषांसह महिलाही व्यसनांच्या आहारी गेलेल्या आहेत. मद्यपान, धूम्रपान या गोष्टी महिलांसाठी अत्यंत सामान्य झालेल्या आहेत. महाराष्ट्रातील एका नामांकित फर्टिलिटी सेंटरमध्ये दर महिन्यात येणाऱ्या ३० ते ४५ वयोगटातील ३० पैकी किमान दहा जोडपी वंध्यत्वाला तोंड देत असल्याचे निदर्शनास आले आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना अधिक मानसिक आणि भावनिक समस्यांना सामोरे जावे लागते. शिवाय या जोडप्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. आत्मविश्वास खालावणे, अयशस्वी आयव्हीएफ उपचारांमुळे उद्भवणारा ताण, मागील अपयशांमुळे आलेले दडपण आणि या साऱ्यामुळे नात्यांवर होणारे परिणामही बघायला मिळतात.
बोलण्यात संकोच
६० टक्के जोडपी भीतीमुळे वंध्यत्वाच्या संघर्षांबद्दल त्यांच्या जोडीदाराशी चर्चा करणे टाळतात. उरलेली ४० टक्के जोडपी ही कौटुंबिक किंवा मैत्रीपूर्ण संबंधांतून आपली समस्या समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतात, असेही निदर्शनास आले आहे.
नैराश्याचा सामना
गर्भधारणेसंबंधीत समस्येचा सामना करताना जोडप्यांना भावनिक समस्यांना सामोरे जावे लागते. पालक म्हणून एखाद्याच्या योग्यतेबद्दल सतत प्रश्न विचारल्यामुळे दुःख आणि निराशेची खोल भावना येऊ शकते. प्रजनन क्षमतेच्या आव्हानांना तोंड देत असलेले जोडपे एकमेकांपासून दूर जात असल्याचे दिसून येऊ शकते कारण ते स्वतःला दोष देतात आणि गर्भधारणेसाठी संघर्ष करतात, असेही मनोविकार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.