इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः शिक्षण मंत्रालयाने परीक्षा पारदर्शक आणि निष्पक्ष करण्यासाठी तज्ज्ञांची एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती परीक्षा प्रक्रियेत सुधारणा, डेटा सुरक्षा प्रोटोकॉल आणि ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ची रचना सुधारण्यावर काम करणार आहे. ही समिती दोन महिन्यांत आपला अहवाल शिक्षण मंत्रालयाला सादर करणार आहे.. ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष डॉ के राधाकृष्णन या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष असतील.
या उच्चस्तरीय समितीच्या यादीत एम्सचे माजी संचालक रणदीप गुलेरिया यांचाही समावेश आहे. या समितीमध्ये हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू बी.जे.राव, प्रोफेसर एमेरिटस, आयआयटी मद्रासचे सिव्हिल इंजिनीअरिंग विभागाचे प्राध्यापक राममूर्ती, ‘पीपल स्ट्राँग’चे सह-संस्थापक आणि कर्मयोगी भारतचे बोर्ड मेंबर पंकज बन्सल, प्रोफेसर आदित्य मित्तल, शिक्षण मंत्रालयाचे सहसचिव गोविंद जयस्वाल यांचा समावेश आहे. शिक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, उच्च-स्तरीय पॅनेल मुळापासून शेवटपर्यंतच्या परीक्षा प्रक्रियेचे विश्लेषण करेल आणि परीक्षा प्रणालीमध्ये करता येणाऱ्या सुधारणा सुचवेल. यासह, पॅनेल ‘एनटीए’च्या विद्यमान डेटा सुरक्षा प्रक्रियेचे आणि प्रोटोकॉलचे मूल्यांकन करेल आणि त्यात सुधारणा करण्यासाठी शिफारश करेल.
ही समिती ‘एनटीए’च्या प्रत्येक स्तरावरील अधिकाऱ्यांची भूमिका आणि जबाबदाऱ्या तपासणार आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकार परिषदेत ‘एनटीए’च्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करावी, असे सांगितले होते. ‘एनटीए’ अधिकाऱ्यांसह दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली ‘नीट-यूजी’ परीक्षेतील गैरप्रकाराविरोधात देशभरातील रोष पाहायला मिळत आहे. या प्रकरणचा मास्टरमाइंडचा शोध सध्या बिहार पोलिस घेत आहेत. आतापर्यंतच्या तपासात नूरसराय महाविद्यालयातील कर्मचारी संजीव मुखिया हा पेपर लीक करणाऱ्या टोळीचा म्होरक्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका प्राध्यापकाने संजीव यांना व्हॉट्स ॲपवर प्रश्नपत्रिका पाठवल्याचा आरोप आहे.