नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विषारी रसायण शरिरात गेल्याने कारखाना कामगारास अपंगत्व आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंपनीच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने सुविधा न पुरविण्यात आल्याने हा प्रकार घडला असून, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात कंपनी व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सिताबाई भगवान डोंगरे (रा.मोरवाडी,सिडको) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सिताबाई डोंगरे यांचा मुलगा मिलींद डोंगरे (३२) हा अंबड औद्योगीक वसाहतीतील लिअर कॉप्रोरेशन कंपनीत नोकरीस आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये तो केमिकल प्लॉटमध्ये काम करीत असतांना ही घटना घडली. डोंगरे यांची प्रोडक्शन विभागात नेमणुक असतांना २९ सप्टेंबर रोजी त्यास बळजबरीने केमिकल विभागात काम करण्यास भाग पाडण्यात आले होते.
कामास नकार दिल्याने व्यवस्थापनाच्या वतीने त्यास नोकरीवरून काढण्याचा इशारा देण्यात आला होता. केमिकल विभागात सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही सुविधा न पुरविल्याने हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शरिरात विषारी रसायण केल्याने डोंगरे यांना कायमस्वरूपी अपंगत्व आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मुगले करीत आहेत.