नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– २३ जून हा दिवस जागतिक ऑलिम्पिक दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. हा दिवस उत्साहात साजरा करण्याच्या हेतूने गेल्या अनेक वर्षापासून नाशिक डिस्ट्रिक्ट मल्टी गेम्स असोसिएशन, कालिका मंदिर, यशवंत व्यायाम शाळां आणि विविध क्रीडा असोसिएशन यांच्या वतीने अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते. या वेळीही उद्या रविवार दिनांक २३ जून रोजी काळाराम मंदिर ते कालिका मंदिर या मार्गावर क्रीडा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर दिनांक २३ ते ३०जून या ऑलिम्पिक क्रीडा सप्ताहां अंतर्गत आयोजित कार्यक्रमासाठी भारताचे महान फुटबॉल खेळाडू (गोलकीपर) ब्रह्मानंद सगुण कमत संकवालकर आणि ब्रीज या खेळाचे आधारस्तंभ तथा महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे कायम अध्यक्ष जे. के. भोसले यांना खास निमंत्रित करण्यात आले आहे.
या मान्यवरांचे आज नाशिकमध्ये आगमन झाले आहे. त्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या मान्यवरांच्या हस्ते उद्या रविवार, २३ जून रोजी सकाळी ७.३० वाजता काळाराम मंदीर, पंचवटी तेथे क्रीडा ज्योत प्रज्वलीत करण्यात येणार आहे. ही क्रीडा ज्योत खेळाडू धावत-धावत पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, महात्मा गांधी रोड, मेहेर सिग्नल, सी. बी. एस. गडकरी चौक मार्गे कालिका मंदिर येथे घेवून येतील. यानंतर सप्ताहामध्ये आयोजित विवीध क्रीडा स्पर्धांना या मान्यवरांची प्रमुख उपस्थीती असणार आहे. नाशिकच्या बाल, तरुण खेळाडूंना जास्तीत जास्त फायदा व्हावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी क्रीडा संस्थाचा हा प्रयत्न आहे.
तरी नाशिकच्या क्रीडा प्रेमीनी या उपक्रमात उत्स्पूर्तपणे सहभागी व्हावे आणि हा ऑलीम्पिक सप्ताह यशस्वी करावा असे आवाहन नाशिक डिस्ट्रिक्ट मल्टी गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे, उपाध्यक्ष गोरखनाथ बलकवडे, अशोक दुधारे, संजय पाटिल, आनंद खरे, अविनाश खैरनार, राजू शिंदे आणि विवीध खेळांचे पदाधिकारी, प्रशिक्षक यांनी केले आहे.