सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) डांगसौंदाणे येथील बस स्थानक परिसरातील व्यापारी संकुलाजवळ सर्पमित्र सुभाष पवार यांना आज सकाळी रसल कुकरी नावाचा दुर्मिळ साप आढळून आला. हा बिनविषारी साप असून जिल्ह्यात यापूर्वी त्र्यंबकेश्वरमध्ये एकदाच आढळला होता, तर दुसऱ्यांदा बागलाणमध्ये दिसला आहे, अशी माहिती सर्पमित्र पवार आणि वनविभागाने दिली आहे.
या सापाची लांबी १८ ते २० इंच असून, त्याचे शरीर गुळगुळीत व खवले असलेले असते. त्याच्या शरीरावर पायापासून शेपटीपर्यंत रंगीत पट्टे असतात. भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, तुर्कस्तान, इराण, श्रीलंका या देशांत ही प्रजाती आढळते. हा साप दाट झाडी, खडकाळ भाग आणि जंगलातील झाडांमध्ये आढळतो. निशाचर असलेला हा साप सरडा, पाली, लहान कीटक आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांची अंडी हे प्रमुख खाद्य म्हणून खातो. बागलाण वनविभागाच्या दप्तरी या सापाची पहिल्यांदाच नोंद झाल्याची माहिती पवार यांनी दिली आहे.