नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चांदवड शहरात माहेरून एक कोटी रूपये आणावेत या मागणीसाठी विवाहीतेस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संकेत कोतवाल, संगिता कोतवाल, शुभम कोतवाल (रा.सर्व चांदवड जि.नाशिक) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत नाशिकरोड भागात राहणा-या पीडितेने तक्रार दाखल केली आहे. मे २०२३ मध्ये पीडितेचा संकेत कोतवाल याच्याशी विवाह झाला.
त्यानंतर संशयितांनी माहेरून एक कोटी रूपये आणावेत या मागणीसाठी छळ केला. विवाहीतेने पैसे आणण्यास नकार दिल्याने संशयिताकडून वेळोवेळी मारहाण करण्यात आली. तसेच काही दिवसांपूर्वी पतीने गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा गुन्हा चांदवड पोलीसांकडे वर्ग करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.