नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पर्यटन सहलीच्या बहाण्याने एकाने लाखोंना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्राहकांकडून पैसे घेवून भामट्याने पिकनिक पॅकेज कंपनीस भरणा न केल्याने हा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश गोपाळ मुखर्जी (रा.साई दर्शन अपा.कमलापार्क माहिमरोड पालघर) असे संशयित ठगबाजाचे नाव आहे. याबाबत सविता प्रकाश मुखर्जी (रा.सदगुरूनगर,गोविंदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित व तक्रारदार महिला एकमेकांचे नातेवाईक असून सविता मुखर्जी यांची क्लब व्हेकेशन हॉलीडे नावाची पिकनिक कंपनी आहे. या कंपनीचे गोविंदनगर भागात कार्यालय असून कंपनीकडून नियमीत पर्यटनस्थळी सहलींचे आयोजन करण्यात येते. नातेवाईक असलेल्या संशयिताने कंपनीसाठी ग्राहक जोडण्याची हमी देत त्याबाबत अधिकृत असल्याबाबत करार केला होता.
हा करार दाखवून त्याने सन.२०१८ ते जानेवारी २०२४ या काळात अनेक ग्राहकांकडून सहलीच्या बहाण्याने पैसे घेतले मात्र कंपनीकडे त्याचा भरणा केला नाही. पैसे भरूणही सहलीचे आयोजन न करण्यात आल्याने ग्राहकांनी कंपनीकडे विचारणा केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून संशयिताने कंपनीच्या नावे सुमारे ४ लाख १० हजाराची रक्कम परस्पर गोळा केल्याचे पुढे आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शिरसाठ करीत आहेत.