इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अयोध्या येथील मंदिरात राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा करणारे मुख्य पुजारी पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांनी वाराणसीमध्ये शेवटचा श्वास घेतला. दीक्षित यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला.
अयोध्या येथील मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होऊन १२१ वैदिक ब्राह्मणांचं नेतृत्व त्यांनी केले होते. या पूजेत त्यांचा मुलगा आणि कुटुंबातील इतर सदस्यही सहभागी झाले होते. तसेच डिसेंबर २०२१ मध्ये काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनाच्या पूजेतही ते सहभागी झाले होते.
लक्ष्मीकांत दीक्षित यांचे महाराष्ट्राशी जवळचे नातं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकामध्ये दीक्षित यांच्या पूर्वजांचाही सहभाग होता.