इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे शुक्रवारी झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीवर मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली. ही बैठक मॅनेज बैठक होती. सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही. सगेसोयरे द्यायचं नाही. मराठ्यांना काहीही मिळू द्यायचे नाही, यासाठी ही बैठक दाखवायला घेतल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठीकीबाबत जरांगे पाटील म्हणाले, सरकारमधील ज्या मंत्र्यांनी हे आंदोलन करायला लावले. त्यांनी ही बैठक मॅनेज केली. आम्हाला येवल्या वाल्यासारखी पोटजळी नाही. त्यांना काहीही मिळाले तर आम्हाला त्रास नाही. पण आम्हाला काही मिळाले की ते विरोध करतात असेही ते म्हणाले. ओबीसी नेत्यांच्या दबावात सगळं सुरु आहे. आमच्या नोंदी खऱ्या आहेत, आणि आमची एकही नोंद रद्द झाली तर मंडळ कमिशनने दिलेल्या बोगस आरक्षणावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली.
ओबीसींच्या बैठकीत काय चर्चा झाली ते मला माहिती नाही. सरकारने आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला द्यावे. समिती त्यांच्यासाठी असेल तर असावी. आमचा काही आक्षेप नाही, अशी भूमिका देखील मांडली. यावेळी त्यांनी सांगितले की, भुजबळ काय सांगतात त्यावर विश्वास नाही. मराठा कुणबी एकच आहे हे आम्ही सिद्ध करतो. नाहीतर तुम्ही सिद्ध करा. आम्ही सगळ्यांचा आदर करतो. सन्मान करतो. मी कुणालाही दुखावलं नाही. सर्वांनी एकत्र बसावं, असे सरकारला वाटते, ओबीसी नेत्यांना वाटते तर आम्हीही बसायला तयार आहोत.