नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथील ३० स्मार्ट शाळांचे ई-उद्घाटन केले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमलात आणलेल्या नवीन शैक्षणिक धोरण (NEP) २०२० अंतर्गत अहमदाबाद म्युनिसिपल स्कूल बोर्डाने ३६ कोटी रुपये खर्चून ३० स्मार्ट शाळा विकसित केल्या आहेत, असे अमित शाह यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. या ३० स्मार्ट शाळांचे उद्घाटन झाल्यामुळे १० हजारांहून अधिक बालकांना राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे प्रत्यक्ष लाभ मिळतील आणि त्यांच्या जीवनात ज्ञानाचा आणि शिक्षणाचा प्रकाश पसरेल, असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला.
गांधीनगर लोकसभा मतदारसंघातील एकूण ६९ शाळांपैकी ५९ शाळा स्मार्ट बनल्या आहेत आणि उर्वरित शाळाही लवकरच त्या दर्जापर्यंत पोहोचणार आहेत, असेही शाह यांनी सांगितले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांनंतर गृहमंत्री तसेच गांधीनगरचे खासदार या नात्याने प्रथमच गुजरातमध्ये आल्याचेही केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह म्हणाले. या दौऱ्यादरम्यान, त्यांचा पहिला कार्यक्रम समाजाच्या वंचित आणि दुर्बल स्तरातील बालकांच्या कल्याणासाठी आखला गेल्याचे त्यांनी सांगितले. खासदार म्हणून पाठिंबा दिल्याबद्दल सदैव गांधीनगर लोकसभा मतदारसंघाच्या ॠणात राहणार असल्याची भावनाही शाह यांनी यावेळी व्यक्त केली.