इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : मे महिन्यात एनसीबी मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला होता. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली होती. या कारवाईमुळे समीर वानखेडे यांची जोरदार चर्चा झाली होती, तसेच दोन वर्षांपूर्वी ते नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई झोनचे प्रमुख असताना बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याचा समावेश असलेल्या कथित ड्रग जप्तीच्या प्रकरणासह काही हाय-प्रोफाइल प्रकरणे हाताळताना ते चर्चेत आले होते. मात्र आता पुन्हा एकदा वानखेडे चर्चेत आले आहेत मात्र समीर वानखेडे नव्हे तर त्यांचे वडील यांच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. कारण त्यांच्या वडिलांची ऑनलाईन सुकामेवा खरेदी करण्याच्या प्रकरणात मोठी फसवणूक झाली आहे. एका भामट्याने १ रुपया देऊन त्यांच्याकडून ३१ हजार रुपये उकळल्याची घटना उघड झाली आहे .
त्या वस्तूचे पैसेही यूपीआयमार्फत त्यांनी पाठवले. मात्र, झाली फसवणूक
समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (७४) यांनी ऑनलाइन बदाम व काजू मागवले होते. मात्र, सायबर भामट्यांनी त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी त्यांनी ओशिवरा पोलिसांकडे तक्रार केल्यावर अनोळखी व्यक्तीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. या संदर्भात तक्रारदार वानखेडे यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, फेसबुकवर सुक्या मेव्याची जाहिरात पाहिली होती. त्यात मॅप ऑफ मंगलम ड्रायफ्रूट आणि अजित बोरा या नावाचा उल्लेख करत मोबाइल नंबर व नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटचाही पत्ता नमूद करण्यात आला होता. त्यामुळे वानखेडे यांना काही ड्रायफ्रूट्स खरेदी करायचे असल्याने त्यांनी सदर क्रमांकावर फोन केला. त्यानंतर बदाम, काजू, अंजीर आणि अक्रोड अशी सुमारे दोन हजार रुपये किमतीचा सुका मेवा त्यांनी ऑर्डर केला. त्याचे पैसेही यूपीआयमार्फत पाठवले. मात्र, त्यांना पुन्हा त्याच क्रमांकावरून फोन आला व वानखेडे यांचे ड्रायफ्रूटचे पार्सल तयार झाले असून जीएसटीमुळे ते लॉक झाल्याचे सांगत अनलॉक करावे लागेल, असे सांगितले.
त्या भामट्याने त्यांना लावले चंदन…
मोबाईल मधील नव तंत्रज्ञान असो की ऑनलाईन पेमेंट करण्याची पद्धत, ही नव्या पिढीला चांगल्या प्रकारे अवगत असते. मात्र ज्येष्ठ नागरिक तथा वृद्धांना या संदर्भात फारशी माहिती नसते याचाच फायदा भामटे घेतात, या प्रकरणातही असेच घडले.सायबर भामट्यांनी तेव्हा वानखेडेंना पैसे परत करण्याचे भासवत बँक खात्याचा प्रॉब्लेम असल्याचे सांगत एक रुपया पाठवला. तसेच गुगल पे मध्ये जाऊन तो जे कोड देतोय ते टाका आणि सबमिट करा, असे सांगितले. त्यामुळे वानखेडेंनी त्याच्यावर विश्वास ठेवत तसेच केले आणि त्यांच्या खात्यातून काही पैसे पाठवले. त्यानंतर भामट्यांनी नंतर थोडी थोडी रक्कम काढत जवळपास त्यांना ३१ हजार १९ रुपयांला चंदन लावण्यात आले. याप्रकरणी त्यांनी त्या फसवणूक करणाऱ्या बोरा याच्याविरोधात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे यांना बांगलादेशातून जीवे मारण्याची धमकी फोनवर मिळाली होती. याप्रकरणी त्यांनी पोलीस आयुक्तांना ईमेल मार्फत तक्रार मिळाल्यावर गोरेगाव पोलीस तपास करत आहेत. आता पुन्हा एकदा पोलिसांना वानखडे यांच्या कुटुंबीय तथा परिवारासंदर्भातील फिर्यादीची चौकशी करावी लागत आहे.