नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– दिंडोरी तालुक्यातील शेतक-याला गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. दरमहा मोबदल्यासह बॅकेचे हप्ते भरण्याची ग्वाही देत चौघा भामट्यांनी ट्रॅक्टर चालविण्यास घेवून बॅकेसह शेतक-यांनी खरेदी केलेले ट्रॅक्टर चालविण्यास घेवून मोबदल्यासह बँकेचे हप्ते न भरल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून, याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवराज संतू गांगोडे (रा.वाघाड ता.दिंडोरी),मोहित भास्कर गांगोडे (रा.पिंपळगाव ब.ता.निफाड),ज्ञानेश्वर दत्तात्रेय वैद्य (रा.बहादुरी ता.चांदवड) व दत्तात्रेय बाळासाहेब शिरसाठ (रा.लखमापूर ता.दिंडोरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत रूंजा गणपत लिलके (४० रा.कोचरगाव ता.दिंडोरी) यांनी फिर्याद दिली आहे. लिलके यांच्यासह कोचरगाव येथील काशिनाथ मंगळू लिलके,रमेश मंगळू लिलके,नवसू मुरलीधर बुरूंगे व आजू बाजूच्या गावातील अनेक शेतक-यांना वेगवेगळी आमिषे दाखवून मायको सर्कल येथील आरबीएल बँकेच्या माध्यमातून ट्रॅक्टर खरेदी करण्यास भाग पाडले.
शेतक-यांकडून शेतीच्या कागदपत्र मिळवून संशयिताच्या पुढाकारातून बॅकेकडून कर्जमंजूरीसह ट्रॅक्टरही शेतक-यांना मिळाले. यानंतर संशयितांनी ट्रॅक्टरला नियमीत काम मिळण्याची हमी देत दरमहा दहा हजार रूपयांच्या मोबदल्यासह बँकेचे हप्तेही भरण्याची ग्वाही दिल्याने ही फसवणुक झाली. मार्च २०२२ पासून ट्रॅक्टर ताब्यात घेवूनही संशयितांनी दरमहा मोबदला आणि बॅकेचे हप्ते न भरल्याने हा प्रकार पोलीसात गेला असून शेतक-यांनी संशयितांशी संपर्क साधला असता त्यांनी शिवीगाळ करीत धमकावल्याने शेतक-यांनी पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.