मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुरवातीला ‘पेपर लीक झाले नसल्याची’ बतावणी करणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी उशिरा का होईना #NEET परीक्षेत गडबडी झाल्याची बाब मान्य करून नैतिक जबाबदारी घेतली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. परंतु केवळ डिपार्टमेंटल चौकशी करून चालणार नाही, कारण हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे त्यामुळे याप्रकरणी सखोल आणि पारदर्शक चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली.
त्यानंतर त्यांनी राज्य सरकारवरही गंभीर आरोप केले. ते म्हणाले महाराष्ट्रात तर सरकारच्या डोळ्यादेखत प्रत्येक परीक्षेचा पेपर फुटला, प्रत्येक परीक्षेत घोळ झाला, २५-२५ लाखाला जागा विकल्या गेल्या, लाखो युवांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले, परंतु अनेकदा आवाज उठवूनही या निर्लज्ज, निगरगट्ट सरकारने कुठलीही कारवाई न करता घोटाळे दाबण्याचीच SERIOUS भूमिका घेतली.
विद्यार्थ्यांनी घोटाळेबाजांविरोधात तक्रारी दाखल करूनही कुठलीही कारवाई मात्र झाली नाही. उलट आम्ही विद्यार्थ्यांचा आवाज उठवला तर आमच्यावरच कारवाई करण्याची भाषा केली. काही कोटींच्या मालिद्यासाठी राज्यातल्या युवांच्या स्वप्नांची राखरांगोळी करणाऱ्या सरकारला आणि त्यांच्या भ्रष्ट मंत्र्यांना महाराष्ट्र कदापि माफ करणार नाही.