इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – भारतीय क्रिकेट संघ काही वर्षांपूर्वी न्युझीलंड दौऱ्यावर असताना सचिन तेंडुलकरसह सगळेच खेळाडू मधल्या दिवसांमध्ये पर्यटनात रमलेले होते. अनेकांना साहसी क्रीडा प्रकार करण्याची हौसही भागवली होती. आता सध्या भारतीय क्रिकेट संघ हिमाचल प्रदेशात असून दोन दिवसांचे पर्यटन करण्याची संधी आहे, मात्र काही गोष्टींवर बीसीसीआयने बंदी घातली आहे.
भारतीय क्रिकेट संघात नव्या-जुन्या खेळाडूंची संख्या सारखीच आहे. सिनीयर-ज्युनियर हा भेद दौऱ्यावर असताना जवळपास बाजुला ठेवला जातो. विशेषतः पर्यटनाच्या वेळी तर त्याचा विसरच पडतो. अशावेळी सिनीयर खेळाडू देखील नवीन मुलांप्रमाणे वागायला लागतात. धरमशाला येथे न्युझीलंड विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाचा पुढील सामना इंग्लंडविरुद्ध २९ ऑक्टोंबरला आहे. तोपर्यंत बऱ्यापैकी वेळ मिळाला आहे. अशात दोन दिवस हिमाचल प्रदेशातील दऱ्या-खोऱ्या फिरण्याची संधी त्यांना मिळाली आहे. मात्र फिरायची मोकळीक देण्यापूर्वीच त्यांच्यावर काही बंधने संघ व्यवस्थापनाने घातले आहेत.
विशेषतः भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेच तसे स्पष्ट बजावले आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने सर्व खेळाडूंना डोंगरावर ट्रेकिंग करण्यास बंदी घातली आहे. भारतीय खेळाडू शहरातील इतर ठिकाणांना भेट देऊ शकतात, परंतु ट्रेकिंगला पूर्णपणे मनाई आहे. हे नियम वरिष्ठ खेळाडूंना देखील लागू आहेत. हिमाचल प्रदेशातील या दऱ्या ट्रेकिंगसाठी खूप प्रसिद्ध आहेत आणि खूप आकर्षक ठिकाणेही आहेत. अशा स्थितीत भारतीय खेळाडूही ट्रेकिंगसाठी उत्सुक होते. मात्र, विश्वचषकामुळे भारतीय संघ कोणत्याही खेळाडूच्या दुखापतीची जोखीम पत्करू शकत नाही. अशा स्थितीत ट्रेकिंगवरील ही बंदी सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही पाहिली जात आहे.
खेळाडूंची निराशा
संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना कळवले आहे की ते ट्रेकिंगला जाऊ शकत नाहीत, ते बाहेर कुठेही फिरायला जाऊ शकतात, पण ट्रेकिंग करू शकत नाहीत. त्याचबरोबर या मालिकेदरम्यान कोणताही भारतीय खेळाडू पॅराग्लायडिंग करू शकत नाही. कारण, हे खेळाडूंच्या कराराच्या विरोधात आहे. त्यामुळे खेळाडूंची निराशा झाली आहे, परंतु त्याला काहीच पर्याय नाही.