नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर वेगवेगळया ठिकाणी झालेल्या पाच घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे १२ लाख १० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव इंदिरानगर व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना इंदिरानगर येथील कलानगर भागात घडली. याबाबत पदमाकर गोविंदराव सोनार (रा.राजलक्ष्मी सोसा. छत्रपती चौक कलानगर) यांनी फिर्याद दिली आहे. सोनार कुटुंबिय दि.१६ ते १८ जून दरम्यान बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. दुस-या घटनेत नकुल काशिनाथ सिनकर (रा.गणेश पॅराडाईज,कलानगर) यांचेही घर फोडण्यात आले असून चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे अलंकार व रोकड असा सुमारे ५ लाख २९ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक सोनार करीत आहेत.
तिसरी घटना विहीतगाव येथील हांडोरे मळा भागात घडली. याबाबत राजू हरी हांडोरे (रा.शिवसमर्थ नगर) यांनी फिर्याद दिली आहे. हांडोरे कुटूंबिय मंगळवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास अल्पावधीसाठी घराबाहेर पडले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४ लाख ६१ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीश्रक महाजन करीत आहेत.
चौथ्या घटनेत दोन घरफोडी झाली. आडगाव शिवारातील कोनार्क नगर भागात राहणारे तुषार रघुनाथ शिंदे व सुरेश बाबु राजापन्ना आचार्य (रा.दोघे साई व्हिला अपा.कोणार्कनगर) या एकाच इमारतीत राहणा-या शेजा-यांचे कुटूंबिय बुधवारी (दि.१९) घराबाहेर पडले असता ही घरफोडी झाली. शिंदे व आचार्य कुटूंबिय आपआपल्या कामानिमित्त घराबाहेर गेल्याची संधी साधत चोरट्यांनी दोघा शेजा-यांची घरे फोडून सुमारे २ लाख २० हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे.अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचा कडीकोयंडा तोडून या घरफोड्या केल्या. याप्रकरणी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात एकत्रीत गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक दायगडे करीत आहेत.