इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी सुरु केलेल्या प्राणांतिक उपोषणामुळे सरकारचे लक्ष वेधले आहे. शुक्रवारी जालन्यातील वडीगोद्री येथे हाके यांची राज्य सरकारमधील मंत्र्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
या पोस्टमध्ये मुंडे यांनी म्हटले आहे की, राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचे समजते. ते योग्यच आहे. हाकेंचे उपोषण हे त्यांचे नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वाना समान न्याय व सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे. सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करावी, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी. या साध्या त्यांच्या दोन मागण्या इतर मागण्यांसमवेत आहेत. शिष्टमंडळाने उपोषणास भेट दिली असली तरी राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी, म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखे होईल अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि ती मान्यच कराल हा मला विश्वास आहे.