मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पावसाळ्याच्या हंगामामुळे राज्यातील ८३०५ सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ही निवडणूक ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतचा आदेश राज्य शासनाने जारी केला आहे.
सरकारने काढालेल्या आदेशात म्हटले आहे की, हवामान विभागाने २०२४ मध्ये सर्वसाधारण पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, राज्यातील १४ जिल्ह्यात मागील वर्षाच्या सरासरीच्या १०० टक्के पेक्षा जास्त आणि ५ जिल्ह्यात सरासरीच्या ७० टक्के पेक्षा जास्त पाऊस झाल्याचे दिसून आले आहे.
त्यामुळे बहुतेक जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील पेरणी, पीक लागवड आणि इतर अनुषंगिक शेतीविषयक कामात व्यस्त आहे. अशा शेतकऱ्यांना ते सभासद असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. ही बाब विचारात घेऊन राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया पावसाचा हंगाम पूर्ण होईपर्यंत (३० सप्टेंबर, २०२४) पुढे ढकलणे उचित होईल अशी शासनाची धारणा आहे, असं राज्य सरकारने आदेशात म्हटले आहे.
याअगोदरही वेगवेगळ्या कारणाने सहकारी संस्थाच्या निवडणूका पुढे ढकलण्या आल्या आहे. आता पावासचे कारण दिले असले तरी त्यात राजकीय काही कारण असावे असे सहकारी चळवळीत काम करणा-यांनी सांगितले आहे.