नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पोलीसात तक्रार केल्याच्या रागातून एकाने दोघा मित्रांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दोघा तरूणांनी वेळीच पळ काढल्याने ते बालंबाल बचावले असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिल राजारम सोनवणे (रा.पिंपळगाव शिवार ता.जि.नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत रोहिदास कोंडाजी ढेमसे (रा.दाढेगाव पो.पिंपळगाव खांब ता.जि.नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी (दि.१९) दुपारी दाढेगाव मारूती मंदिर परिसरात ही घटना घडली. ढेमसे व बाळासाहेब भालके हे दोघे मित्र एमएच १५ सीके ५५९८ पिकअप वाहनात बसलेले असतांना संशयिताने माझ्या विरोधात पोलीसात तक्रार करतात का ? असे म्हणत आपल्या वाहनातून कोयता काढून ढेमसे यांच्या दिशेने फिरकवला.
मात्र दोघा मित्रांनी प्रसंगावधान राखत धुम ठोकल्याने दोघे बचावले असून संशयिताने जीवे मारण्यासाठी कोयता घेवून पाठलाग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास जमादार बकाल करीत आहेत.