नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मखमलाबाद गावात घरासमोर उभे असल्याचा जाब विचारल्याने टोळक्याने बाप लेकांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत टोळक्याने लोखंडी पाईप व कोयत्याचा वापर केल्याने वडिलांसह दोघे मुले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात महिलेचाही समावेश आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय संदिप काकड,बाळू संदिप काकड, रोहन भगवंत गडदे, राजेंद्र गडदे, भगवंत गडदे, मिराबाई संदिप काकड व त्यांचे चार साथीदार अशी बापलेकांना मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत संजय नामदेव आव्हाड (रा.नामदेव भवन,माळी मंगल कार्यालया शेजारी जुना शिव रस्ता मखमलाबादगाव) यांनी फिर्याद दिली आहे. गेल्या मंगळवारी (दि.१८) ही घटना घडली.
संशयित सायंकाळच्या सुमारास आव्हाड यांच्या घरासमोर नाहक उभे होते. त्यामुळे आव्हाड यांनी त्यांना येथे का थांबले येथून निघून जा असा सल्ला दिल्याने संतप्त संशयितांनी थांब तुला दाखवितो असे म्हणत शिवीगाळ केली. यावेळी रोहन गडदे याने अन्य साथीदारांशी संपर्क साधून बोलावून घेतल्याने हा वाद हाणामारीवर गेला. टोळक्याने गैरकायद्याची गर्दी जमवित आव्हाड यांच्यासह मोहित व संकेत या दोन मुलांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत लोकंडी पाईपासह कोयत्याचा वापर करण्यात आल्याने तिघे बापलेक जखमी झाले असून अधिक तपास हवालदार गवारे करीत आहेत.