इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सातारा : कोणताही सण आनंद आनंदात साजरा व्हावा, अशी सर्वांची इच्छा असते. यासाठीच सार्वजनिक ठिकाणी साजरा करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. मात्र या दरम्यान दुर्घटना घडण्याची शक्यता असते. किंबहुना आजच्या काळात सण उत्सव काळामध्ये दुर्घटना वाढल्याचे दिसून येते. गणेशोत्सव काळात राज्यभरात ठिकठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान दुर्घटना घडवून सुमारे ३० जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता नवरात्र उत्सवामध्ये देखील मिरवणुकी दरम्यान अशाच काही घटना समोर येत आहेत. त्यामध्ये थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण महाबळेश्वर येथे दुर्गादेवीची मिरवणूक काढली असताना जनरेटरचा स्फोट होऊन त्यामध्ये आठ बालके जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
वास्तविक पाहता कोणताही सण उत्सव साजरा करताना काळजी घेणे आवश्यक असते. सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा होतो, तेव्हा गर्दी ही होतेच, मात्र गर्दीमध्ये काही दुर्घटना तर घडणार नाही ना ? याची देखील काळजी घेणे गरजेचे असते. यासाठी कोणतेही साहित्य अथवा यंत्रे ही जबाबदारीने काळजीपूर्वक हाताळली गेली पाहिजेत. यंत्रणा नादुरुस्त नाहीत ना किंवा त्याच्यातील दोषातून काही दुर्घटना होणार नाही ना याची देखील काळजी घ्यायला हवी, मात्र अशा ठिकाणी काळजी घेतली जात नाही. त्यातूनच मग काहीतरी घटना घडते. महाबळेश्वर मध्ये देखील असेच घडले. येथे दुर्गादेवी मिरवणुक सायंकाळपासून सुरू झाली होती, मात्र रात्री आठ वाजेच्या दरम्यान अचानकपणे दरम्यान ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये असलेल्या जनरेटरच्या पाईपचा भीषण स्फोट झाला. यामध्ये आठ मुले व मुली भाजून गंभीर जखमी झाली असून त्यांना तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नवरात्र स्वच्छ अखेरच्या दिवशी म्हणजे दसऱ्याला अनेक शहर आणि गावांमध्ये देवीची मिरवणूक काढण्याची प्रथा परंपरा आहे. वाजत -गाजत देवीची मिरवणूक सुरू असताना अचानक ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये असलेल्या जनरेटरच्या पेट्रोल पाईपचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की ट्रॅक्टरच्या मागे असलेली आठ ते दहा वयोगटातील लहान मुले व मुली यात भाजून गंभीर जखमी झाली. जखमी झालेल्या सर्व मुलांना वाहनाने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर दुर्गा देवीची मिरवणूक साध्या पद्धतीने काढण्याचा निर्णय दुर्गा उत्सव समितीने घेतला आहे.