नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा पुरवत आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविले असलेल्या नाशिक येथील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर येथे डॉ.राज नगरकर व त्यांच्या टीमने आणखी एक किमया करुन दाखविली आहे. बायलॅट्रल फेओक्रोमोसिटोमा या दुर्मिळ आजाराने ग्रासलेल्या २१ वर्षीय युवा रुग्णावर क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडतांना डॉक्टरांनी त्याला जीवदान दिले आहे. रुग्णाचा रक्तदाब अनियंत्रित राहात होता. व यापूर्वी अनेक ठिकाणी घेतलेल्या उपचारात अपयश आले होते. मात्र एचसीजी मानवता कॅन्सरमध्ये त्याच्या उपचाराला योग्य दिशा मिळाल्याने, येथील डॉक्टरांची टीम युवा रुग्ण व त्यांच्या कुटुंबासाठी देवदूत ठरली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परीषदेत एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे एमडी व चीफ ऑफ सर्जिकल ऑन्कॉलॉजी ॲण्ड रोबोटिक सर्व्हिसेस प्रा. डॉ.राज नगरकर म्हणाले, मोहम्मद जैद हा युवक जेव्हा एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर येथे आला तेव्हा त्याला अनियंत्रित उच्चरक्तदाबाची तक्रार होती. औषधोपचार घेऊनही त्याचा रक्तदाब नियंत्रणात येत नव्हता. त्याने राष्ट्रीय स्तरावरील संस्थांनांमध्ये केलेल्या वैद्यकीय चाचणी केलेली होती. यामध्ये त्याच्या मूत्रपिंडाच्या सभोवताली असलेली अधिवृक्क ग्रंथीजवळ गाठ विकसीत होत असल्याचे निदर्शनात आले. यामुळे असंतुलन निर्माण होऊन रुग्णाचा रक्तदाब अनियंत्रित राहात होता. अशा स्वरुपाच्या गाठीला वैद्यकीय भाषेत फेओक्रोमोसिटोमा असे संबोधले जाते. पुढील चाचण्यांमध्ये असे लक्षात आले की, या गाठीमुळे प्रमुख रक्तवाहिन्यांना अडथळा निर्माण होत होता. व अशा वैद्यकीय स्थितीत शस्त्रक्रिया करणे जोखीमीचे होते.
त्यामुळे या रुग्णाने औषधोपचारातून या आजारावर उपचार घेण्याचा प्रयत्न सुरु ठेवला. अनेक तज्ज्ञांनी औषधांच्या सहाय्याने गाठ कमी करण्याचे प्रयत्न केले. सदर गाठीजवळ जाणारा रक्तप्रवाह रासायनिक पद्धतीने थांबविण्यासाठी केमोइम्बोलायजेशन ही प्रक्रियादेखील पार पाडण्यात आली. या प्रयत्नात अपयश आले असतांनाच या प्रक्रियेनंतर काही वेळेतच युवकाला अर्धांगवायुचा झटका (मेंदूत रक्तस्त्राव व पॅरेलेसिस) आला. त्याने एमआयबीजी थेरेपी हा न्युक्लियर मेडिसीनचा भाग असलेली उपचार पद्धतीनेदेखील फारसा सकारात्मक परीणाम होऊ शकला नव्हता.
उपचाराची दिशा ठरवत
टीमने पार पाडली शस्त्रक्रिया
डॉ.नगरकर पुढे म्हणाले, हा रुग्ण हॉस्पिटलमधील बाह्य रुग्ण विभागात तपासणीसाठी आला असता, त्याच्या वैद्यकीय चाचणी अहवालांचे विश्लेषण केले. रेडिओलॉजी टीमसोबत यासंदर्भात चर्चा केली. या गाठीमुळे पोट, स्वाधुपिंड, यकृत आणि इतर महत्त्वाच्या भागांमध्ये रक्तपुरवठ्यात अडथळे निर्माण होत असल्याचे निष्कर्षांतून समोर आले. सर्वसमावेशक दृष्टीकोनातून विचार करत शस्त्रक्रिया करुन गाठ काढण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा स्वरुपाची शस्त्रक्रिया करण्यात रुग्णाच्या जीवाची जोखीम होती. व तशी कल्पना त्याच्या कुटुंबीयांनादेखील दिलेली होती. परंतु आमच्या हॉस्पिटलमधील निष्णात शल्यचिकित्सक व संपूर्ण टीमच्या कौशल्यांच्या सहाय्याने आम्ही ही शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे.
ही शस्त्रक्रिया डॉ.राज नगरकर, डॉ.विकास जैन, डॉ.राजेंद्र धोंडगे, डॉ.अवैस सैय्यद, डॉ.शौधर्या व्ही., डॉ.प्रवीणकुमार सुरपुर तर भुलतज्ज्ञांच्या टीममध्ये डॉ.नयना कुलकर्णी, डॉ.रविंद्र तांदळे, डॉ.जितेंद्र महाजन, इन्टेसिव्हीस्ट डॉ.पुर्वा मगरकर यांची सहाय्यता लाभली.
फिओक्रोमोसाइटोमा या आजारात ग्रंथीभोवती गाठ वाढत जाऊन यामुळे हार्मोन्समध्ये होणार्या बदलांमुळे रक्तदाब अनियंत्रित राहात असतो. अशा वेळी सततची डोकेदुखी, अनियमित स्वरुपातील हृदयाचे ठोके या सामान्य स्वरुपाच्या तक्रारी अशा रुग्णांमध्ये आढळतात. या रुग्णाला आधीच अर्धांगवायुचा झटका आलेला होता. व तो त्यातून पूर्णपणे सावरलादेखील होता. पण शस्त्रक्रियेदरम्यान रक्तदाब वाढण्याची (२२०/१२० एमएमएचजी) तर शस्त्रक्रियेनंतर रक्तदाब खालावण्याची जोखीम होती. परंतु हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर औषधोपचाराने रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यात आले.
तब्बल साडे सहा तास चालली शस्त्रक्रिया
जीवाची जोखीम असली तरी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी डॉ.राज नगरकर व त्यांच्या टीमवर पूर्णपणे विश्वास दाखविला. आवश्यक वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर नुकताच काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया पार पडली. ही शस्त्रक्रिया तब्बल साडे सहा तासांहून अधिक वेळ चालली. डॉक्टरांच्या टीमने आपल्या निपुण कौशल्यांचा वापर करतांना व भुलतज्ज्ञांनीही आपली जबाबदारी प्रभावीपणे निभावतांना सांघिक समन्वयातून रुग्णाच्या शरीरातून गाठ पूर्णपणे काढण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर लगेचच रुग्णाचा रक्तदाब सामान्य झाला. व त्याना रक्तदाब नियंत्रणासाठी कुठल्याही औषधांची गरज राहिली नाही. एका दिवसातच त्याला आयसीयुमधून सामान्य विभागात हलविण्यात आले. व त्याने सर्वसामान्यांप्रमाणे आहार घेण्यास सुरुवात केली.