नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पत्नी व सासरच्या मंडळीच्या जाचास कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सुसाईड नोटमुळे हा प्रकार समोर आल्याने मृताच्या वडिलांनी पोलीसात धाव घेतली असून, मृताच्या पत्नीसह सासरच्या चार जणांना पोलीसांनी अटक केली आहे.
शितल तुषार अंतापुरकर, केदाबाई वसंत चव्हाण, वसंत सोनू चव्हाण व पंकज वसंत चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत केशव विष्णू अंतापूरकर (रा.दत्तनगर कोणार्कनगर) यांनी फिर्याद दिली आहे. अंतापूरकर यांच्या तुषार अंतापूरकर या मुलाने मंगळवारी (दि.१८) आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली.
सुसाईड नोट मध्ये पत्नीसह सासरच्या मंडळीकडून होणा-या मानसिक जाचासह दबावास कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आढळून आल्याने मृताच्या वडिलांनी पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. पोलीसांनी तात्काळ मृताच्या पत्नीसह तिच्या आई वडिलांना व भावास अटक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक निकम करीत आहेत.
…..