नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत तब्बल ५ (पाच) लाख टन कांद्याचा बफर स्टॉक करण्यासाठी चार महिन्यांपूर्वी दिल्लीतील अधिकाऱ्यांनी नाशिक येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांकडून हा कांदा घेतला जाईल अशी घोषणा केली होती.
प्रत्यक्षात लोकसभा निवडणूक होऊन गेली तरीही नाफेड व एनसीसीएफची कांदा खरेदी सुरू झाली नाही जेव्हा नाफेड व एनसीसीएफची कांदा खरेदी सुरू झाली तेव्हा सुरुवातीला प्रती क्विंटल २००० पेक्षाही कमी तर नंतर २१०५ तर त्यानंतर २५५५ या दराने नाफेड व एनसीसीएफने कांदा खरेदी सुरू केली परंतु शेतकऱ्यांना आपल्या कांद्याला बाजार समित्यांमध्ये लिलावात नाफेड व एनसीसीएफच्या कांदा खरेदीच्या दरापेक्षा अधिकचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड व एनसीसीएफला कांदा न देण्याची भूमिका घेतली होती.
सुरुवातीला नाफेड व एनसीसीएफचे स्थानिक पातळीवरील कांदा खरेदीचे दर ठरवण्याचे अधिकार गोठवले असे सांगून दिल्लीतील ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून हे नाफेडचे प्रत्येक आठवड्याचे दर जाहीर करण्याचा नवीन निर्णय यावर्षी घेण्यात आला. परंतु दिल्लीतूनही ठरलेले नाफेडसाठीचे कांदा खरेदीचे दर बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कांद्याच्या दरापेक्षा कमीच असल्याने शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकार बद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.
आता पुन्हा आज २० जून पासून नाफेड व एनसीसीएफला बफर स्टॉकसाठीच्या कांदा खरेदीचे दर दिल्लीतील ग्राहक व्यवहार मंत्रालय कडून ठरव्याऐवजी स्थानिक अधिकारीच हा दर ठरवणार असून आज २० जून २०२४ चा शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांना नाफेड एनसीसीएफच्या कांदा खरेदीसाठीचा प्रतिक्विंटलचा दर जिल्ह्यानुसार पुढील प्रमाणे आहे अहमदनगर (अहिल्यानगर) २३५७ रु बीड २३५७ रु नाशिक २८९३ रु धुळे २६१० रु छत्रपती संभाजीनगर २४६७ रु धाराशिव २८०० रु सोलापूर २९८७ रु पुणे २७६० रु नाफेड आणि एनसीसीएफकडून जाहीर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला नासिकसह राज्यातील बाजार समित्यांमध्ये यामध्ये ३२०० ते ३५०० पर्यंत जास्तीत जास्त मिळतोय .
शेतकऱ्यांनी आपला कांदा देऊ नये
यावर्षी केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून बफर स्टॉकसाठी पाच लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्टे ठेवले होते परंतु ज्या वेळेस बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल दर मिळत होते त्यावेळेस नाफेड व एनसीसीएफने शेतकऱ्यांकडून हा कांदा किमान साडेतीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करणे आवश्यक होते.
आता शेतकऱ्यांना बाजार समित्यांमध्ये सरकारच्या कांदा खरेदीच्या दरापेक्षा अधिकच दर मिळत असल्याने नाफेड व एनसीसीएफसाठी कांदा खरेदी करणाऱ्या फार्मर प्रोडूसर कंपन्यांना शेतकऱ्यांनी आपला कांदा देऊ नये असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे
भारत दिघोळे
अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.