नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– इमरजन्सी बल्ब खरेदी विक्री व्यवसायात गुंतवणुक करण्यास भाग पाडून एकाने तरूणास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत युवकाची साडे तीन लाख रूपयांची फसवणुक झाली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहूल राजाजी उर्फ बिट्टू (रा. तारांगण सोसा. ओमकारनगर, मखमलाबाद) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठकबाजाचे नाव आहे. याबाबत गगण प्रविण कोकाटे (२५ रा.वृंदावननगर,म्हसरूळ) या युवकाने फिर्याद दिली आहे. संशयिताने गेल्यावर्षी कोकाटे यास पंचवटी भाजीपाला मार्केट यार्ड भागात गाठून इमरजन्सी लाईट खरेदी विक्री व्यवसायातील गुंतवणुकीबाबत बोलणी केली होती.
या व्यवसाय मोठा नफा असल्याची बतावणी करीत संशयिताने वेगवेगळी आमिषे दाखविली. कोकाटे यांनी तयारी दर्शविल्याने संशयिताने वेळोवेळी भेट घेत गुंतवणुकीच्या बहाण्याने कोकाटे यांच्याकडून फोन पे,युपीआय आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सुमारे ३ लाख ३९ हजार २५० रूपयांची रक्कम स्विकारली. मात्र त्यानंतर त्याने गुंतवणुकीची रक्कम परत न करता भेटण्यास टाळाटाळ केल्याने तक्रारदार कोकाटे यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.