इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहमदनगरः लोकसभा निवडणुकीचे निकाल घोषीत झाले तरी अजूनही त्याबाबत पराभूत उमेदवारांचे समाधान झाले नाही. अनेक मतदार संघात पराभूत उमेदवार हे न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार सुजय विखे यांनी मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांनी एका मतदान केंद्रासाठी ४७ हजार २०० रुपये याप्रमाणे एकूण १८ लाख ८८ हजार रुपयांचे शुल्क भरले आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदे, पारनेर येथील प्रत्येकी दहा, नगर, शेवगाव-पाथर्डी, कर्जत- जामखेड, राहुरी येथील प्रत्येकी पाच अशा ४० केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी विखे यांनी केली आहे.
डॉ. विखे पाटील यांच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हा निवडणूक विभागाने राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयाला प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाणार आहे. ४५ दिवसांच्या आत उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली, तर न्यायालयाच्या परवानगीने पडताळणीचा निर्णय होऊ शकतो.
२८ हजार ९२९ मतांनी पराभव
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नीलेश लंके यांनी सुजय विखे यांच्यात अटीतटीची सामना झाला. त्यात लंके यांनी विखे यांचा २८ हजार ९२९ मतांनी पराभव केला. लंके यांना ६ लाख २४ हजार ७९७, तर विखे पाटील यांना ५ लाख ९५ हजार ८६८ मते मिळाली.