नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शालिमार भागात छेडखानीबाबत जाब विचारल्याने तोंड ओळख असलेल्या दोघांनी पतीस मारहाण करीत पत्नीचा विनयभंग केल्याची घटना घडली. या घटनेत लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आल्याने पती जखमी झाला असून संशयितांनी दांम्पत्याच्या दुकानात शिरून तोडफोड केली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंटी शहा व आरबाज हुसेन पठाण (रा.रसूलबाग कब्रस्थान समोर खडकाळी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार महिला व तिचा पती गेल्या रविवारी (दि.१६) रात्री शालीमार भागातील आपल्या दुकानाबाहेर उभे असतंना तोंड ओळखीच्या बंटी शहा याने महिलेकडे बघून शिट्टी वाजविली.
यावेळी पीडितेच्या पतीने त्यास जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी पतीस शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी पीडिता आपल्या पतीच्या मदतीसाठी धावून गेली असता दोघांनी तिला धक्काबुक्की करीत विनयभंग केला. तसेच दुकानाचीही तोडफोड केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सपकाळे करीत आहेत.