मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै होणा-या निवडणुकीला स्थगिती द्यावी यासाठी शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. दोन दिवसापूर्वीच निवडणूक आयोगाने ११ जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. त्याबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर ठाकरे गटाने ही भूमिका घेतली आहे.
शिवसेना ठाकरे गटाने सांगितले की, आमदार अपात्रता संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. त्यावर अंतिम निर्णय झालेला नसताना विधान परिषद निवडणूक घेणे हे घटनाबाह्य आहे. त्यामुळे या निवडणुकीला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलैला मतदान होणार असून त्याचदिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीसाठी २५ जून रोजी निवडणूक आयोग अधिसचून जाहीर केली जाणार आहे. उमेदवारांना दोन जुलैपर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. तीन तारखेला अर्जांची छानणी होणार आहे. उमेदवारांना पाच तारखेपर्यंच माघार घेता येईल. १२ जुलैला सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान होईल.
हे उमेदवार होणार निवृत्त
विजय गिरकर, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील (भाजप), महादेव जानकर (भाजप मित्र पक्ष), अनिल परब (शिवसेना ठाकरे गट), मनीषा कायंदे (शिवसेना शिंदे गट), डॉ. वजाहत मिर्झा व डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस), बाबाजानी दुराणी (राष्ट्रवादी), जयंत पाटील (शेकाप) हे आमदार निवृत्त होणार आहेत.