चेन्नई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विषारी दारू प्यायल्याने किमान २५ जणांचा मृत्यू झाला, तर ६० हून अधिक लोकांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तामिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्ह्यात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटकही केली आहे. आरोपींकडून मिथेनॉलमिश्रित दोनशे लिटर विषारी दारू जप्त करण्यात आली आहे.
या घटनेवर शोक व्यक्त करताना तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन म्हणाले, की कल्लाकुरिचीमध्ये भेसळयुक्त दारू प्यायल्याने लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून मला धक्का बसला आणि दु:ख झाले. या प्रकरणी गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना अटक करण्यात आली आहे. हे थांबवण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या लोकांची माहिती जनतेने दिल्यास तत्काळ कारवाई केली जाईल. समाजाला बरबाद करणाऱ्या अशा गुन्ह्यांना कठोरपणे आळा घालण्यात येईल.