नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- देवदर्शन आटोपून घराकडे परणा-या महिलेच्या गळयातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्याने ओरबाडून नेल्याची घटना अशोका मार्ग भागात घडली. या घटनेत सुमारे ५० हजार रूपये किमतीच्या मंगळसुत्रावर चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरा छबुराव कुटे (रा.शुभम अपा.अशोकामार्ग ) यानी फिर्याद दिली आहे. कुटे मंगळवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे परिसरातील गणेश बाबा मंदिरात गेल्या होत्या. देवदर्शन आटोपून त्या घराकडे परतत असतांना ही घटना घडली. मंदिराच्या दक्षिण बाजू कडील दरवाजा समोरील गल्लीतून त्या घराकडे पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्याने त्यांच्या गळ््यातील सुमारे ५० हजार रूपये किमतीचे दोन पदरी पोत हिसकावून नेली. अधिक तपास हवालार टेमगर करीत आहेत.
३९ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– कोणार्क नगर भागात राहणा-या ३९ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तुषार केशव अनंतापुरकर (३९ रा.शो संस्कृती रो हाऊस,दत्तनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तुषार अनंतापुरकर यांनी मंगळवारी (दि.१८) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये पंख्यास लोखंडी तारेने गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत वडिल केशव अनंतापुरकर यांनी दिलेल्या खबरी वरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बनकर करीत आहेत.