मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उबाठा सेनेच्या तुलनेत आपल्यावर शिवसेनेच्या मूळ मतदारांनी विश्वास दाखवला असून त्यामुळेच आपला स्ट्राईक रेट हा त्यांच्यापेक्षा चांगला राहिला आहे. सत्तेसाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी तडजोड करून त्यांना मुंबईत यश मिळाले असून काँग्रेसच्या व्होट बँकेवर मिळालेला हा उबाठा सेनेचा विजय असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
शिवसेनेचा ५८वा वर्धापन दिन सोहळा बुधवारी मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या सात खासदारांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, मंत्री, खासदार, आमदार, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेनेने कोणत्याही जाती धर्माचा द्वेष न करता कायम सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे राजकारण केले आहे. यावेळी जसे आपण काहीसे गाफील राहिलो तसे विधानसभा निवडणुकीत गाफील राहून चालणार नाही, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ‘ग्रामसभा ते विधानसभा’ सर्वत्र भगवा फडकवण्याच्या निर्धाराने कामाला लागावे असे त्यांनी शिवसैनिकांना सांगितले.