नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मार्केट यार्डात बलात्काराची धमकी देत टोळक्याने भाजीपाला विक्रेता महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना मार्केट यार्डात घडली. गेल्या डिसेंबर महिन्यात घडलेल्या या घटनेत टोळक्याने कोयत्याने वार करीत लोखंडी रॉडने मारहाण केल्याने महिला जखमी झाली होती. न्यायालयाच्या आदेशाने पंचवटी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदिप अशोक लाड (३५), धरम भास्कर शिंदे (४०), रमेश पांडूरंग बोडके (४१),सुरज उर्फ सु-या रमेश बोडके (३०),विनोद रमेश बोडके (२८) व धिरज रमेश बोडके (२५) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पदमा प्रकाश शिंदे (३५ रा.भराडवाडी,फुलेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. शिंदे या गेल्या ५ डिसेंबर रोजी भाजीपाला विक्रीसाठी मार्केट यार्डात गेल्या असता ही घटना घडली होती.
भाजीपाला विक्री करून त्या रात्री आठच्या सुमारास घराकडे परतत असतांना संशयित टोळक्याने त्यांना अडवून पूर्वी झालेल्या भांडणाबाबत आमच्या विरोधात जबाब नोंदविला तर बलात्कार करून मारून टाकू अशी धमकी दिली. भेदरलेल्या महिलेने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता संदिप लाड याने त्यांच्यावर धारदार कोयत्याने वार केले तर धरम शिंदे याने लोखंडी रॉड मारून जखमी केले. या घटनेत उर्वरीत संशयितांनी महिलेस लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे करीत आहेत.