नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन कुटुंबियांमध्ये झालेल्या वादातून क्रिकेटची बॅट डोक्यात मारल्याने गंभीर जखमी झालेले दुकानदार जितेंद्र गुलाबसिंग ठाकूर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. जुन्या नाशकातील नाईकवाडीपुरा येथील एका गल्लीमध्ये हा प्रकार घडला. भद्रकाली पोलिसांत संशयितांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि विनायक ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित सनी मोजाड, बंटी चव्हाण हे नाईकवाडीपुरा येथील गल्लीत क्रिकेट खेळत असताना त्यांचा चेंडू किराणा दुकानात येत असल्याने दुकानदार जितेंद्र ठाकूर हे त्यांना समजावण्यास गेले होते. त्यावेळी संशयित मोजाड, चव्हाण या दोघांसह दोन महिलांनी ‘क्रिकेट खेळू देत नाही ना तुला मारूनच टाकतो’ असे बोलून शिवीगाळ करत मारहाण केली.
सनी मोजाड याने जितेंद्र ठाकूर यांच्या डोक्यात बॅट मारल्याने ठाकूर भोवळ येऊन खाली पडले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना ठाकूर यांचा मृत्यू झाला. भद्रकाली पोलिसांनी संशयित दोघांनाही अटक केली आहे.
पत्नी व मुलालाही मारहाण
जिंतेद्र ठाकूर हे बँक ऑफ बडोदा मधील कर्मचारी आहे. क्रिकेट खेळणाऱ्या बॅटने डोक्यात जबरदस्त चार-पाच वार करून हत्या करण्यात आली व त्यांची पत्नी सौ सुनीता जितेंद्र ठाकूर यांना बरगडी व कमरेमध्येही जोरदार मार केल्याने त्याही गंभीरपणे जखमी झाले आहे व त्यांचा मुलगा विनायक जितेंद्र ठाकूर यांच्या दहाव्या हाताला जबर मार लागल्याने फॅक्चर असून व त्याच्या डोळ्याला ही दुखापत झाली आहे व त्याच्या दात देखील पडला आहे. मयत हे नाशिक शहर काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष डॉ वसंत ठाकूर यांचे मोठे बंधू होते.