नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शरण फॉर अॅनिमिल संस्थेत व्यवस्थापिकेने सहा लाख रूपयांच्या रकमेचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अन्य कर्मचा-यांच्या बँक खात्यात ही रक्कम वळती करून फसवणुक करण्यात आली आहे. दोन अडिच वर्ष उलटूनही भरणा न केल्याने याप्रकरणी पोलिस स्थानकात तक्रार करण्यात आली आहे.
साक्षी कृपाशंकर दुबे, कृपाशंकर दुबे (रा. दोघे गौळाणे रोड एसएसके क्लब जवळ पाथर्डी गाव) व यश किर्तीकुमार पंचारिया (२८ रा.राधिका अपा.वासननगर,पाथर्डी फाटा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत शरण्या शशिकांत शेट्टी (रा.पाटील रेसि.विसे मळा,कॅनडा कॉर्नर) यांनी फिर्याद दिली आहे.
शेट्टी या शरण फॉर अॅनिमिल नावाची संस्था चालवितात. या संस्थेच्या माध्यमातून प्राण्यांच्या संगोपनासह देखरेखीचे काम चालते. या संस्थेच्या कामकाजासाठी साक्षी दुबे या व्यवस्थापक पदावर कार्यरत असून त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत डिसेंबर २०२१ मध्ये हा आर्थिक अपहार केला आहे. दुबे यांनी डिसेंबर २०२१ ते ऑगष्ट २०२३ दरम्यान एमजीओ पंचारियासह कृपाशंकर दुबे आणि स्व:ताच्या बँक खात्यात संस्थेच्या रकमेतील सहा लाख रूपयांची रक्कम परस्पर वर्ग करून काढून घेतली. ही बाब निदर्शना येताच तक्रारदार शेट्टी यांनी पैश्यांसाठी तगादा लावला मात्र संशयितांनी वेळ मारून नेली. दोन – अडिच वर्ष उलटूनही संशयित संस्थेची रक्कम भरत नसल्याने शेट्टी यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.