मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा पाठोपाठ शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका २६ जूनला होणार आहे. त्यानंतर विधान परिषदेतून निवृत्त होत असलेल्या ११ आमदारांच्या रिक्त पदांसाठी निवडणूक होणार आहे. १२ जुलै रोजी यासाठी विधानसभेचे सद्स्य मतदान करतील व त्याचदिवशी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये पुन्हा महायुती व महाविकास आघाडी आमने सामने असणार आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीकडे असलेल्या आमदारांची संख्या विचारात घेतली, तर महायुतीचे आठ, तर महाविकास आघाडीचे तिघे आमदार म्हणून विजयी होऊ शकतात अशी माहिती राजकीय तज्ञांनी दिली आहे.
या निवडणुकीत एका आमदाराच्या विजयासाठी २३ मतांचा कोटा ठरवण्यात आला आहे. या कोट्याचा विचार करता आणि पक्षीय बलाबल पाहिले, तर महायुतीचे आठ तर महाविकास आघाडीचे तीन आमदार सहज निवडून येऊ शकतात.
विधानसभेत भाजपचे १०३ आमदार असून त्याला दहा अपक्ष व छोट्या पक्षांचा पाठिंबा आहे. त्यांचे चार आमदार सहज निवडून येऊ शकतात. शिवसेना शिंदे गटाकडे ३७ आमदार असून त्यांनाही दहा अपक्षांचा पाठिंबा असल्याने त्यांचे दोन आमदार निवडून येऊ शकतात. अजित पवार यांच्याकडे ३९ आमदार असून त्यांचा किमान एक आमदार निवडून येऊ शकतो. युतीतील तिन्ही पक्षांकडे असलेल्या अतिरिक्त मतांवर आणखी एक आमदार निवडून येऊ शकतो. महाविकास आघाडीत काँग्रेसकडे ३७, ठाकरे यांच्या शिवसेनेचे १५ व शरद पवार यांच्याकडे १३ आमदार आहेत. त्यांचे तीन आमदार निवडून येऊ शकतात.