मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मंत्री छगन भुजबळ नाराज असून ते ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा सुरु असतांना खा. संजय राऊत यांनी त्याचे खंडण केले. ते म्हणाले की, अशा अफवा राजकीय संभ्रम निर्माण करण्यासाठी पसरवल्या जात आहेत. मात्र, यामध्ये कोणतेही तथ्य नाही.
नाशिक लोकसभेत उमेदवारी न मिळाल्यामुळे भुजबळांनी अगोदर जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर राज्यसभेसाठी ते इच्छुक होते. पण, त्यांना तेथेही उमेदवारी मिळाली नाही. त्यात आरक्षणा संदर्भात सरकारच्या भूमिकेवरही त्यांची नाराजी आहे. त्यामुळे ते वेगळा निर्णय घेऊ शकतात अशी चर्चा होती. त्यांचे खंडणही त्यांनी नंतर केले. पण, त्यांची शिवसेनेच्या नेत्यांबरोबर बैठक झाल्याचे वृत्त धडकले व राजकीय चर्चांना उधान आले.
त्यावर खा. राऊत यांनी आज स्पष्टपणे भूमिका मांडली. ते म्हणाले की, भुजबळ हे एकेकाळी शिवसेनेते होते, नंतर ते काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि आता ते अजित पवार गटासोबत आहेत. आता त्यांचे शिवसेनेशी काहीही नाते नाही. अशा अफवा राजकीय संभ्रम निर्माण करण्यासाठी पसरवल्या जात आहेत. मात्र, यामध्ये कोणतेही तथ्य नाही, त्यामुळे आता जर कोणी अशा अफवा पसरवत असतील की भुजबळ आणि ठाकरे गटात काही चर्चा सुरू आहे. तर ते चुकीचं आहे. आमच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही. शिवसेनेचे सगळं उत्तम सुरु आहे आणि आम्हाला वातावरण बिघडवायचे नाही, असेही राऊत म्हणाले.