नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय फायनान्स कंपनीच्या शाखेतील तिजोरीतून ४ कोटी ९२ लाख रूपये किमतीचे सोन्याचे अलंकार लंपास करणा-या टोळीतील संशयिताला गुंडा विरोधी पथकाने गुजरात राज्यातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. सुतावरून स्वर्ग गाठत पोलीसांनी थरारक पाठलाग केल्याने संशयित हलोल शहर परिसरात हाती लागला. या संशय़िताचा एका खुनाच्या गुन्हयातही सहभाग आहे.
सतिश कैलास चौधरी (२७ रा. महाराणा प्रताप चौक,सिडको) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गंगापूरनाका भागात गेल्या ४ जून रोजी ही घटना घडली होती. आयसीआयसीआय फायनान्स कंपनी लिमिटेड गंगापूर नाका शाखेतील तिजोरीतून चोरट्यांनी तब्बल ४ कोटी ९२ लाख रूपये किमतीचे सोन्याचे अलंकार लांबविले होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस तपासात वैभव लहामगे, तुकाराम गोवर्धने, रतन जाधव, सतिश चौधरी व अर्जुन पाटील नामक संशयितांची नावे उघड झाल्याने पोलीसानी धरपकड मोहिम हाती घेतली होती. त्यातील संशयित सतिश चौधरी, रतन जाधव व अर्जुन पाटील फरार होते. पोलीस उर्वरीत संशयितांच्या मागावर असतांना शहर गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित पोलीसांच्या हाती लागला. रतन जाधव व सतिश चौधरी या संशयितांनी स्विफ्ट कार खरेदी केली असून, ते गेल्या १५ ते २० दिवसांपासून आध्रप्रदेश,कर्नाटक व राजस्थानात फिरून सध्या गुजरात राज्यात मुक्कामी असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.
गुंडा विरोधी पथकाने तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुजरात राज्यातील हलोल शहर गाठून परिसर पिंजून काढला. पोलीसांनी तळ ठोकला असता संशयित नुकतेच तिरूपती बालाजी येथे जावून आल्याची माहिती पथकास मिळाली. दोघांनी डोक्यावरील केस काढलेले असल्याच्या माहिती वरून पोलीसांनी केस नसलेल्या इसमांवर लक्ष केंद्रीत केले. पोलीस दोघांचा शोध घेत असतांना सोमवारी (दि.१७) डोक्यात टोपी घातलेले तरूण स्विफ्ट कार एमएच १२ एव्ही ०८१८ मधून प्रवास करतांना आढळून आले.
पोलीसांनी तात्काळ संशयितांचा पाठलाग केला. मात्र चाहूल लागताच भामट्यांनी धुम ठोकली. ८ ते १० किमी हा थरार सुरू होता. पोलीसांनीही त्याचा पिछा पुरविल्याने संशयितांनी शहरा बाहेरील जंगला जवळ आपले वाहन सोडून पोबारा केला. पथकातील कर्मचा-यांनी जंगल पिंजून संशयित सतिश चौधरी यास हुडकून काढले असून, तो घनदाट जंगलात एका झाडाच्या मागे लपून बसला होता. संशयिताचा वाडिव-हे पोलीस ठाण्यात दाखल खूनाच्या गुन्ह्यात समावेश असून त्या गुन्हयातही तो फरार होता.
ही कारवाई आयुक्त संदिप कर्णीक,उपायुक्त प्रशांत बच्छाव,सहाय्यक आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, प्रविण चव्हाण,मलंग गुंजाळ, डी.के.पवार, राजेश सावकार, सुनिल आडके, गणेश भागवत, नितीन गौतम, गणेश नागरे,निवृत्ती माळी, सुवर्णा गायकवाड आदींच्या पथकाने केली.