नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ३ लाख ३१ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकड सोन्याचे दागिणे व युनिक कॉईनचा समावेश आहे. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्यामकांत गोविंदराव पाटील (रा. शिंदे मळा, भैरव कॉलनी, अशोकनगर, सातपूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पाटील कुटूंबिय बुधवारी (दि.१२) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड, सोन्याचे अलंकार व युनिक क्वाईन असा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक नळकांडे करीत आहेत.
घरासमोर बांधून ठेवलेल्या सात शेळया चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घरासमोर बांधून ठेवलेल्या सात शेळया चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना मालधक्का रोड भागात घडली. या घटनेत सुमारे ६० हजार रूपये किमतीच्या बक-या चोरट्यांनी पळविल्या असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद सदाशिव गायकवाड (रा.महात्मा फुलेनगर,मालधक्कारोड) यांनी फिर्याद दिली आहे. गायकवाड यांच्या मालकिच्या बक-या शनिवारी (दि.१५) रात्री नेहमीप्रमाणे त्यांच्या घरासमोर बांधलेल्या असताना चोरट्यांनी त्या सोडून नेल्या. अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.
५७ वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सातपूर परिसरातील गुलमोहर विहार कॉलनी भागात राहणा-या ५७ वर्षीय महिलेने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर विवाहीतेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मनिषा मथुराप्रसाद दुबे (रा.आदित्य रो हाऊस,गुलमोहर कॉलनी) असे मृत महिलेचे नाव आहे. दुबे यांनी मंगळवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात बेडरूममध्ये पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच पती मथुरामप्रसाद दुबे यांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार गावीत करीत आहेत.