नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारत निवडणूक आयोगाकडून नाशिक विभाग शिक्षक मतदासंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झालेला असून 26 जून 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणूकीसाठी मतदार म्हणून नोंदणी केलेल्या शिक्षक मतदारांनी अवश्य मतदान करून मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ जलज शर्मा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी 26 जून 2024 रोजी होणारे मतदान हे मतदान मतपत्रिकेद्वारे केले जाणार आहे. त्या अनुषंगाने मतदारांनी मतदान कसे करावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेले निर्देश जिल्हा प्रशासनाकडून मतदारांना सुलभ मार्गदर्शनासाठी खालीलप्रमाणे दिलेले आहेत.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी असे करावे मतदान
- मतदान करण्याकरीता मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करावा. इतर कोणत्याही पेन, पेन्सिल, बॉल पॉईंटपेन किंवा इतर साहित्याचा वापर करू नये.
- मतदान पंसतीक्रमानुसार (order of preference) असल्याने मतदारांनी पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात १ हा अंक लिहून मतदान करावे. १ हा अंक फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर लिहावा. यापुढील पसंतीक्रम जसे 2,3,4…… नोंदवीणे ऐच्छिक आहे.
- जेवढे उमेदवार निवडणूक लढवित आहेत त्या सर्वांचे संख्येइतके पसंतीक्रम मतदारास नोंदविता येतील.
- मतपत्रिकेवर नमूद करावयाचा पसंतीक्रम केवळ अंकामध्ये व एकाच भाषेत ( देवनागरी, इंग्रजी, रोमन किंवा राज्य घटनेतील आठव्या परिशिष्टामध्ये नमूद कोणतीही
- इतर भाषा) नमूद करवयाचा आहे. उदा. 1,2,3,4,5…. किंवा १,२,३,४…. किंवा I,II,III,IV,V….
- सदर पंसतीक्रम शब्दात (एक, दोन, तीन…. इ) लिहू नये.
- पंसतीक्रमानुसार उमेदवारापुढे “X” किंवा “☑️ ” अशी खूण करू नये
- मतपत्रिकेवर नवा / कोणताही शब्द किंवा कुठेही सही / अंगठा करू नये
मतपत्रिका बाद केव्हा ठरेल
- पसंतीक्रम 1 लिहीला नसेल.
- 1 हा पसंतीक्रम एकापेक्षा जास्त उमेदवारास दिला असल्यास.
- पसंतीक्रम १ नक्की कोणत्या उमेदवाराला आहे? याचा बोध होत नसल्यास.
- पसंतीक्रम 1 लिहल्यानंतर त्याच उमेदवारासमोर 2,3,4,5…. असे पसंतीक्रम लिहल्यास
- पसंतीक्रम शब्दात ( एक, दोन, ….इ) असा नोंदविला असल्यास
- पसंतीक्रमाबरोबरच इतर कुठल्यातरी प्रकरची खूण असणे (सही करणे, नाव लिहीणे, अंगठा देणे, “X” किंवा “ ☑️ ” इ) ज्यामुळे मतदाराची ओळख पटेल.
- मतदान केंद्रावर पुरविलेल्या जांभळ्या शाई व्यतिरिक्त इतर शाईने पंसतीक्रम लिहल्यास
- मतपत्रिकेवर पसंतीक्रम वेगवेगळ्या भाषेत लिहल्यास उदा. 1,2,3,4…. तसेच १,2,३, IV….