इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वसईः प्रियकराने भर रस्त्यात सपासप वार करून तरुणीची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना आज सकाळी घडली. रस्त्याच्या मधोमध या तरुणाने डोक्यावर आणि छातीवर एकामागून एक वार केले. दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ब्रेकअप झाल्याने हा तरुण संतापला होता. त्यानंतर त्याने हे भयंकर कृत्य केले. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
इंटरनेटवर या भयानक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पंजाबी ड्रेस घातलेली ही तरुणी रस्त्यावर पडून होती. या तरुणाने हातात पाना धरला होता. तरुणीवर हल्ला करण्यापूर्वी आणि शस्त्र टाकून देण्याआधी माझ्यासोबत असे का केले, असे ओरडून विचारीत होता. रस्त्यावर अनेक लोक असतानाही कोणीही हस्तक्षेप केला नाही. हल्ला थांबविण्यासाठी कुणीही मध्ये पडले नाही. अनेकांनी व्हिडिओ शूट करण्यात धन्यता मानली. काही जण घटनास्थळावरून दूर गेले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पीडितेला मदत करण्यासाठी दुर्दैवाने कोणीही पुढे आले नाही. ही भीषण घटना एकाने शूट केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. आरती असे या वीस वर्षीय तरुणीचे नाव आहे. रोहित यादव नावाच्या तरुणाला पोलिसांनी तात्काळ अटक केली.