नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कार उभी करून गप्पा मारणा-या दोघा मित्रांना टोळक्याने मारहाण करीत लुटल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील फाशीचा डोंगर भागात घडली. या घटनेत टोळक्याने कारची काच फोडून दोघा मित्रांना धमकावित सुमारे दीड लाखाचा ऐवज लांबविला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरीलुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार यश चंद्रकांत कोठावदे (रा. मूळ रा. घाटकोपर, मुंबई. सध्या रा. सरस्वती अपार्टमेंट, कुलकर्णी कॉलनी, शरणपूर रोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कोठावदे व त्यांचा मित्र शनिवारी (दि.१५) रात्री क्रेव हॉटेल पासून काही अंतरावर दोघे मित्र रस्त्याच्या कडेला कार थांबवून गप्पा मारत असतांना ही घटना घडली. आपल्या गाडी जवळ दोघे मित्र गप्पा मारत असतांना १८ ते २५ वयोगटातील चौघांनी त्यांना गाठले. यावेळी एकाने तू येथे का थांबला ? असा प्रश्न उपस्थित करीत शिवीगाळ व दमदाटी केली.
तर उर्वरीतांनी दोघा मित्रांना धमकावीत व अंगझडती घेवून अंगावरील सोन्याचे दागिणे,मोबाईल घड्याळ व खिशातील रोकड असा सुमारे १ लाख ४५ हाजाराचा ऐवज बळजबरीने काढून पोबारा केला. या घटनेत कारची काच फोडून भामट्यांनी ही लुट केली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सोमनाथ गेंगजे करीत आहेत.