इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गेल्या काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ नाराज असून ते मोठा निर्णय घेण्याची चर्चा असतांना नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भुजबळ नाराज नाहीत. ते पक्ष सोडून जाणार असल्याच्या केवळ अफवा असून त्यात काही तथ्य नाही असे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. यावेळी ते म्हणाले छगन भुजबळ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते कोणताही वेगळा विचार करणार नाहीत.
काल मुंबईत एमईटीमध्ये झालेल्या बैठकीत पदाधिका-यांनीच भुजबळांना निर्णय़ घ्यावा असे बोलून दाखवल्यामुळे या चर्चेला उधान आले आहे. ही चर्चा होण्यामागे अनेक कारण असले तरी अलीकडे भुजबळ यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे ही नाराजी समोर आली होती. त्यामुळे तटकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी भुजबळ नाराज नसल्याचे सांगितले.
यावेळी ते म्हणाले छगन भुजबळ आणि पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्या बैठकीत छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत चर्चा होऊन त्यांचे निराकरण झाले. त्यानंतर राज्यसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना छगन भुजबळ यांनी आशीर्वादही दिले असेही त्यांनी सांगितले.
यामुळे सुरु झाली चर्चा
भुजबळांना अगोदर नाशिक लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळाली नाही, त्यानंतर ते राज्यसभेसाठी इच्छुक असतांना येथे सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांच्या नाराजीत भर पडली. पण, त्यांनी मी नाराज नाही असाच सूर त्यांनी लावला. पण, सोमवारी त्यांच्या समर्थकांनी ही नाराजी व्यक्त केला. या नाराजीबरोबरच सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी होणार असल्यास ओबीसींवर अन्याय होईल असाही सूर बैठकीत दिसून आला.. सरकारमध्ये ओबीसींना मिळत असलेल्या सवलतीतही अन्याय होत असल्याची भावना बैठकीत पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे भुजबळ आता या नाराजीतून काय निर्णय घेतात याची चर्चा सुरु झाली.