नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारच्या बफरस्टॉकसाठी शेतकऱ्यांकून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे दर यापूर्वी नाफेडच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून ठरवले जात होते आता नाफेड कांदा खरेदीचे दर दिल्लीतून ठरणार त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार असे सरकारकडून सांगण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात आजही बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला लिलावात मिळणाऱ्या दरापेक्षा नाफेडचे दर कमी असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली.
गेल्या दोन आठवड्यांसाठी नाफेडच्या कांदा खरेदीचे प्रतिक्विंटलसाठी शेतकऱ्यांना दिला जाणारा दर हा २१०५ रुपये होता तर आज मंगळवारी दिल्लीतून ग्राहक संरक्षण मंत्रालयाने या आठवड्यासाठी नाफेड कांदा खरेदीचा दर २५५५ रुपये प्रति क्विंटल इतका ठरवला आहे. आज नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला लिलावात २८००-३००० पर्यंत प्रतिक्विंटलचा दर मिळत असताना नाफेडच्या माध्यमातून सरकार बफर स्टॉकसाठी कांदा खरेदीचे दर मात्र बाजार समित्यांमध्ये मिळणाऱ्या दरापेक्षा कमी देत असल्याने शेतकऱ्यांकडून नाफेड व एनसीसीएफला कांदा दिला जाणार नाही असे स्पष्ट मत भारत दिघोळे यांनी व्यक्त केले आहे.