जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– वडीगोद्री येथे उपोषणाच्या ठिकाणी आज भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे व मंत्री धनजंय मुंडे यांनी भेट दिली. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे दोघे पाच दिवस झाले उपोषण करत आहेत. कालपासून त्यांनी पाणी देखील त्यागले आहे. यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे वंचितांच्या लढ्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत असा धीर देण्यासाठी मी गेले. सरकारमधील प्रमुख नेत्यांनी त्यांच्या मागणीची तात्काळ दखल द्यावी आणि त्यांना सन्मान देऊन उपोषण सोडवावे व न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
पंकजा मुंडे यांच्याबरोबर मंत्री धनंजय मुंडे हे देखील उपस्थिती होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी सरकारला थेट आव्हानच दिलं. ओबीसी आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा, असा प्रश्न त्यांनी राज्य सरकारला केला आहे. यावेळी त्या म्हणाल्या या आंदोलनाला कायद्याच्या चौकटीत बसून कसा न्याय देणं हे सरकारचं कर्तृव्य आहे. मी कुठली प्रतिनिधी म्हणून इथे आलेली नाही. तर मला असं वाटलं की, इथेसुद्धा मोठ्या नेत्यांनी येऊन आंदोलकांच्या भावना ऐकून घेतल्या पाहिजेत आणि न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
दोन दिवसापूर्वीच पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती.त्यात त्यांनी म्हटले होते की, प्रा. हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले असताना शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. मायबाप सरकारकडून समान न्यायाची अपेक्षा असते. प्रा. हाके यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पाहावे.