इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इस्लामाबादः भारतात टोमॅटोचे भाव आवाक्यात असतांना मात्र पाकिस्तानमध्ये टोमॅटोचे भाव २०० रुपये किलोवर गेले आहेत. त्यामुळे येथील जनतेची चिंता वाढली आहे. एप्रिलमध्ये टोमॅटोची पाचशे रुपये किलो या दराने विक्री झाली होती.
बकरी-ईदच्या पार्श्वभूमीवर पेशावरमध्ये जिल्हा प्रशासनाने टोमॅटोचा कमाल भाव १०० रुपये प्रतिकिलो ठरवला असताना टोमॅटोची विक्री दुप्पट भावाने विक्री झाली. स्थानिक माध्यमांतील वृत्तानुसार, टोमॅटोच्या दरात एका दिवसात शंभर रुपयांनी वाढ झाली. जिल्ह्याच्या उपायुक्तांनी टोमॅटो जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी घातली असली, तरी सरकारी बंदी केवळ कागदावरच राहिली.
पाकिस्तानमध्ये अलीकडेच करसुधारणा करण्यात आली;मात्र त्याचा परिणाम महागाई रोखण्यासाठी झालेला नाही. ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट पॉलिसी इन्स्टिट्यूट’ चे कार्यकारी संचालक आबिद सुलेरी यांनी महागाई कमी करण्याचा सल्ला दिला होता. पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या असल्या, तरी जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी केलेल्या नाहीत.