मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुमनाम दिन (हरवलेले दिवस) हा एकता मित्तल दिग्दर्शित लघुपट असून कामानिमित्त दूरच्या शहरात स्थलांतरित होऊन आपल्या जवळच्यांपासून दूर गेलेल्या, विरह आणि आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी व्याकुळ झालेल्या लोकांच्या स्थितीचे दर्शन या लघुपटात घडते. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात(मिफ्फ-2024) बर्लिनेल स्पॉटलाईटः बर्लिनेल शॉर्ट्स पॅकेजमध्ये प्रदर्शित झालेल्या लघुपटात विभक्ती हा एक अनिवार्य नित्यक्रम असल्याचे दाखवले आहे. हा लघुपट बर्लिनेल शॉट्स 2020 साठी अधिकृत निवड झालेला लघुपट होता. एकता मित्तल यांनी मिफ्फ संदर्भात घेतलेल्या वार्ताहर परिषदेत सहभागी होताना या लघुपटाच्या निर्मितीमागील त्यांचा दृष्टीकोन आणि त्यातून सादर होणारे एक सखोल कथानक यावर प्रकाश टाकला.
आपल्या चित्रपटाच्या विषयी सांगताना एकता मित्तल म्हणाल्या की हा चित्रपट 2009 मध्ये सुरू झालेल्या प्रदीर्घ प्रक्रियेचा एक भाग होता. ‘बिहाइंड द टिन शीट्स’ या शीर्षकाखाली आम्ही स्थलांतरित बांधकाम मजुरांवर तीन लघुपट बनवले. हे लघुपट पूर्ण करूनही, काहीतरी अपूर्ण असल्यासारखे वाटले आणि म्हणूनच हा लघुपट तयार झाला,” मित्तल यांनी स्पष्ट केले.
या प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांनी स्थलांतरित कामगारांच्या जीवनातील अनिश्चिततेकडेही लक्ष वेधले आहे. त्यांची ओळख अनेकदा त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीनुसार बदलत असल्याचे त्यांनी नमूद केले. अधिक जास्त संशोधन आणि शोधामुळे पंजाबी सुफी कवी शिवकुमार बतालवी यांच्या कवितांवर आधारित ‘बिरहा’ या चित्रपटाची निर्मिती झाली. कामगारांच्या मनावर आपल्या लोकांपासून वेगळे राहण्याचा कशा प्रकारे परिणाम होतो याचा वेध यामध्ये घेतला आहे.गुमनाम दिन या कामगारांच्या आयुष्यातील हरवलेल्या दिवसांवर लक्ष केंद्रित करतो, त्यांच्या नावापालीकडे जाऊन त्यांचे अनुभव उत्कंठावर्धक आणि अमूर्त पद्धतीने टिपतो.
“लोक मूळ ठिकाणापासून दूरावले जाण्याची अनेक कारणे आहेत”, मित्तल म्हणाल्या. एका कामगार वसाहतीत राहणे हा या कामगारांसाठी एकांतवासाचा अनुभव असतो. लघुपटनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान मी स्थलांतरित कामगारांच्या कुटुंबियांसोबत राहिले आणि असे पाहिले की त्यांच्या आयुष्यात कोणतीही गोष्ट किंवा नातेसंबंध कायमस्वरुपी असत नाहीत. कोविड-19 ने याची केवळ पुष्टी केली,” त्यांनी नमूद केले.
त्यांच्या बर्लिनेल अनुभवाविषयी बोलताना एकता मित्तल या महोत्सवाच्या भक्कम आयोजनाची प्रशंसा करत म्हणाल्या की हा अनुभव अतिशय उत्साहवर्धक आणि सन्मानजनक होता.कामगारांना हा चित्रपट आवडेल किंवा समजेल याविषयी काही सांगता येणार नाही मात्र त्यांना तो आपला वाटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भविष्याचा विचार करता, कामगार आणि स्थलांतरितांच्या समस्यांचा वेध घेण्यासाठी मित्तल समर्पित आहेत. त्यांचा पुढचा प्रकल्प राज्यातील अंतर्गत स्थलांतरावर लक्ष केंद्रित करेल आणि कामगारांच्या समस्यांचा अतिशय सखोल अभ्यास सुरू ठेवेल.
गुमनाम दिन हा 28 मिनिटांचा लघुपट हिंदी, पंजाबी आणि छत्तीसगडी भाषांमध्ये आहे. लघुपटांचे स्वरुप अमूर्त आणि काव्यात्मक असले तरी ते कमी खर्चात तयार होतीलच असे सांगता येणार नाही असे मित्तल यांनी नमूद केले. त्यांनी यावर देखील भर दिला चित्रपट हे नेहमीच सक्रियता आधारित असण्याची गरज नाही आणि सर्जनशील पद्धतीने भावनात्मक पैलूंचा देखील वेध घेणारे असू शकतात.
मात्र, माहितीपटांसाठी कमी होत जाणाऱ्या संसाधनांना आणि स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्सवर त्यांना प्रसिद्धी देण्यामध्ये येणाऱ्या आव्हानांना देखील मित्तल यांनी अधोरेखित केले. जर ते महोत्सवात गेले तर त्यांची दखल घेतली जाते, असे मत त्यांनी टेलिव्हिजन लोकप्रियतेची घट नमूद करत व्यक्त केले. त्याच वेळी त्यांनी हे देखील सांगितले की दर्शकसंख्या वाढवण्यासाठी त्यांचा लघुपट वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्याची गरज त्यांना कधीही भासली नाही. मात्र, शैक्षणिक संस्था आणि इतर संस्थांकडून त्यांच्या लघुपटाचे प्रदर्शन करण्यासाठी होणाऱ्या मागण्यांमुळे आपल्याला आनंद वाटतो , असेही त्यांनी सांगितले.