नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या तरूणास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यातून दोन देशी बनावटीचे पिस्तूल जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.
सचिन ओमचंद कागडा (२५ रा.मनपा हॉस्पिटल शेजारी उपनगर) असे संशयित पिस्तूलधारीचे नाव आहे. उपनगर येथील मनपा बिल्डींगसमोर एक तरूण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिट १ पथकास मिळाली होती. त्यानुसार शनिवारी (दि.१५) रात्री पथकाने सापळा लावला असता संशयित पोलीसांच्या जाळयात अडकला. संशयिताच्या अंगझडतीत दोन गावठी पिस्तूल व जीवंत काडतुसे असा सुमारे ६१ हजाराचा ऐवज मिळून आला. याबाबत युनिटचे कर्मचारी विशाल देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितासह मुद्देमाल उपनगर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक प्रविण चौधरी करीत आहेत.