नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– दुचाकीस्वार कोयताधारी त्रिकुट पोलीसांच्या जाळयात अडकले. संशयितांच्या ताब्यातून दुचाकीसह तीन धारदार लोखंडी कोयते हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जैद अनिस अत्तार उर्फ शेख (१९ रा.शिवपुरी चौक पंडीतनगर,सिडको),निलेश सखाराम लोखंडे (१९ रा.पाथर्डीगाव) व अरशद हिकमत शेख (रा.चुंचाळे फाटा,संजीवनगर) अशी संशयित कोयताधारीची नावे आहेत. पपया नर्सरी कडून अंबड लिंकरोडच्या दिशेने ट्रिपलसिट प्रवास करणाºया दुचाकीस्वारांकडे धारदार शस्त्र असल्याची माहिती सातपूर पोलीसांना मिळाली होती.
त्यानुसार रविवारी (दि.१६) सकाळच्या सुमारास पोलीसांनी वखारीजवळील पेट्रोल पंप भागात दुचाकी अडवून तिघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे कोयते मिळून आले. या कारवाईत तीन धारदार कोयते व एमएच १५ इयू ११८९ ही पॅशन प्रो दुचाकी हस्तगत करण्यात आली असून याबाबत अंमलदार भुषण शेजवळ यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार अनिल आहेर करीत आहेत.