नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार अॅड. महेंद्र भावसार यांना निवडणुकीत निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी राष्ट्रवादी भवन या कार्यालयात पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ऍड महेंद्र भावसार यांना अधिकृत उमेदवारी दिली असून राष्ट्रवादी उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागली आहे. त्याकरिता युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी नाशिक दौरा करत पदाधिकाऱ्यांना उमेदवार निवडून आणण्यासाठीची रूपरेषा सविस्तरपणे सांगितली. नाशिक, अहिल्यादेवी नगर, जळगांव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील शिक्षक सदर निवडणुकीत मतदार असून ५ जिल्ह्यातील विधानसभा, गट-गण, तालुका व विभाग अध्यक्षांनी आपापल्या परिसरातील शिक्षक आपल्या उमेदवाराला कसे मतदान करतील व आपण निवडणुकीत कशी काळजी बाळगावी याचे सविस्तर विश्लेषण करत निवडणुकीची रूपरेषा आखून दिली. २६ जून मतदानाची तारीख असून यावेळी आपण काय विशेष काळजी घ्यावी याच्या सूचना यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व महायुतीचे अधिकृत उमेदवार ऍड महेंद्र भावसार असून महायुतीचे पारडे जड असल्याने विरोधक मतदारांमध्ये अनेक संभ्रम निर्माण करतील यामुळे पदाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या.
यावेळी श्रेयांश भावसार, अमर पाटील, गौरव गोवर्धने, योगेश निसळ, चेतन कासव, ऋषिकेश पिंगळे, रोहित पाटील, आदित्य गव्हाणे, निलेश पेलमहाले, मुकेश शेवाळे, अमोल नाईक, संदीप दिघोळे, विशाल डोके, शुभम उगले, सोनू वायकर, शुभम महाजन, राहुल सहाणे, सचिन कालासरे, साहेबराव ढगे, संतोष भुजबळ, करण ढुबे, राहुल पाठक, प्रफुल्ल पाटील, रोशन कदम, आशुतोष चव्हाण, अमर जगताप आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते